"जनसेवा हीच खरी श्रीमंती" श्रीमंत सेवा प्रतिष्ठान ही एक सेवाभावी संस्था असून, तिची स्थापना PMPML (पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.) मधील समविचारी कामगारांच्या पुढाकारातून २०१३ मध्ये झाली. दैनंदिन कर्तव्यासोबत सामाजिक जाण ठेवून, गरजूंच्या मदतीसाठी काही तरी सकारात्मक आणि कायमस्वरूपी योगदान द्यावे या उद्देशाने ही संस्था उभी राहिली. PMPML मधील कर्मचारी हे शहराचा गतीशील भाग आहेत. हेच कर्मचारी आपल्या सेवावृत्तीपलीकडे जाऊन समाजातील वंचित घटकांसाठी काहीतरी चांगले करावे या इच्छेने एकत्र आले आणि श्रीमंत सेवा प्रतिष्ठान या नावाने समाजसेवेची चळवळ सुरू केली. ही संस्था म्हणजे “कामगारांचा समाजासाठी दिलेला हातभार” आहे. “जनसेवा हीच ईश्वरसेवा” या विचाराने प्रेरित होऊन प्रतिष्ठानने सुरुवातीला अन्नदान, रक्तदान यासारखे लहान उपक्रम सुरू केले. प्रतिष्ठान सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक अशा विविध क्षेत्रांत मदत करत आहे.
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरीचा विठुराया, आषाढी वारीसाठी महाराष्ट्रातुनच नव्हे तर इतर राज्यातुनही दिंडया घेऊन वारकरी वारीस येतात. हे आपल्या सर्वाना ज्ञात आहेच. ‘‘अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे’’ म्हणून कात्रज आगारातील आपल्या कर्मचा-यांनी २०१३ मध्ये वारीस येणा-या वारक-यांस अन्नदान करण्याचे ठरविले. त्यानुसार पिराची कुरोली येथे होणा-या दिंडयांच्या संगमावर पहिला अन्नदान सोहळा पार पडला. ती परंपरा २०१३ ते २०२४ पर्यंत अखंड चालू आहे. २०२० व २०२१ मध्ये कोरोना महामारीमुळे त्यात खंड पडला मात्र २०२२ पासुन पुन्हा नव्याने सुरवात होवून अन्नदान सुरू झाले . बाजीराव विहिर, वाखरी येथे अन्नदानाचा कार्यक्रम पार पडतो. या अन्नदान सोहळयात सुमारे २५ ते ३० हजार वारक-यांस अन्नदान केले जाते. अन्नदान सोहळयापुर्वी पुर्वतयारी म्हणून मंडप, आचारी, ध्वनीवर्धक, जेवणाची इतर व्यवस्था मंडळाच्या सभासदांकडून केली जाते.
प्रतिष्ठान तर्फे इतरही काही ‘‘जनसेवा हिच ईश्वर सेवा’’ म्हणून उपक्रम राबविण्यात येतात. सन २०१३ पासून आजतागायत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात येते. २०१५ मध्ये कात्रज आगारातील साईबाबा मंदिरासाठी इलेक्ट्रिक नगारा भेट देण्यात आला. २०१६ मध्ये कामगारासांठी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून कुलर भेट देण्यात आला. २०१७ मध्ये गरजु तीन विदयार्थीनींचा शैक्षणिक खर्च प्रतिष्ठान मार्फत करण्यात आला. कु. तनुजा रिंडे व युक्ता रिठे या विदयार्थीनींचा शैक्षणिक खर्च प्रतिष्ठान मार्फत करण्यात आला. सन २०१९ मध्ये अतिवृष्टी झाली त्याचा परिणाम सर्वत्र झाला. महापूराने अनेक कुटुंबे बेघर झाली. प्रतिष्ठान मार्फत बस्तवाड ता. शिरोळ जि. कोल्हापूर मधील गरजुंना दि.२९/०८/२०१९ रोजी चादर व जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले. कात्रज आगारामध्ये भजनी मंडळास कै. बबनराव महाडिक यांचे स्मरणार्थ टाळ, मृदुंग, हार्मोनियम असा संपुर्ण सेट भेट देण्यात आला.
२०२० हे वर्ष कोराना महामारीचे वर्ष ठरले त्यामुळे ब-याच उपक्रमांना पायाबंध बसला. सन २०२१ मध्ये प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती सोहळा व पी एम पी एम एल रस्ता सुरक्षा अभियान यांचे औचित्य साधुन दि. १७/०२/२०२१ रोजी भारत मातेची अहोरात्र सेवा करणा-या सैनिकांसाठी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळून कात्रज आगारामध्ये २१२ रक्तदात्यांनी रक्तदाने केले. सर्व रक्तदात्यास हेल्मेट व पाणी बॉटल भेट स्वरूपात देण्यात आली. सन २०२२ मध्ये ही शिवजयंतीनिमित्त १८४ रक्तदात्यांनी रक्तदान करून भारतमातेसाठी रक्त सांडणा-या सैनिकांना रक्ताची गरज भासल्यास ती आपल्या रक्तातुन भरून निघण्यासाठी खारीचा वाटा म्हणून रक्तदान केले. रक्तदानाची ही परंपरा आजतागायत सुरु आहे.
सन २०२१ पासुन देव दिवाळी निमित्त अनाथांची माय असा परिचय असलेल्या कै. सिंधूताई सपकाळ यांच्या सासवड येथिल ‘‘ममता बाल सदन’’ या आश्रमास कपडे व आवश्यक भांडयाची मदत करण्यात आली. तसेच २०२२ व सन २०२३ मध्ये अनाथ व निराधार गरजुंना मदत करणारी संस्था ‘‘आसरा’’ व ‘‘अक्षरस्पर्श मतिमंद निवासी विदयालय, जांभुळवाडी‘‘ या संस्थेस पिठाची गिरण भेट देण्यात आली. सन २०२४ मध्ये स.बा.जोशी विदयालय, डोंबिवली येथील गरीब व होतकरू विदयार्थ्यांची शैक्षणिक फी प्रतिष्ठान मार्फत भरण्यात आली. असे विविध उपक्रम प्रतिष्ठान मार्फत राबविण्यात येत आहेत.
ज्ञात अज्ञात दानशुर सेवेस तत्पर आहेतच परंतू सर्वांनीच सेवत सहभागी झाले तर त्यासारखी ईश्वर सेवा नाही असे वाटते. पुढील सर्व उपक्रमात आपणा सर्वांचा सेवामय आर्शिवाद लाभेल एवढी लोभस अपेक्षा. प्रतिष्ठान एक माध्यम आहे, शेवटी कर्ता एक पांडूरंग.
आपला
श्री भरत कृष्णा गिरे
"विठू माऊलीच्या सेवेत अन्नदान व भक्तांसोबत पंढरीचे दर्शन!"
श्रीमंत सेवा प्रतिष्ठान दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने वाखरी , पंढरपुर येथे खास उपक्रम राबवते. या दिवशी संस्थेच्या वतीने हजारो वारकऱ्यांना दिवसभर मोफत अन्नदान, पिण्याचे पाणी, यांची सेवा दिली जाते. याच दिवशी अन्नदान झाल्यानंतर संस्थेचे कार्यकर्ते पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतात.
"शिवसेवेची प्रेरणा – रक्षणासाठी रक्तदान!"
श्रीमंत सेवा प्रतिष्ठान दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने, राष्ट्रसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या भारत मातेच्या वीर जवानांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करते.
शिवजयंतीच्या पावन दिवशी, वीर छत्रपतींच्या शौर्याला अभिवादन करताना, प्रतिष्ठानचा हा उपक्रम "कर्तव्यनिष्ठेचे रक्त, देशाच्या रक्षणासाठी" असा संदेश देतो.
"एक हात मदतीचा... उत्सव देव दिवाळीचा!" या संकल्पनेतून श्रीमंत सेवा प्रतिष्ठान दरवर्षी देव दिवाळीच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करते. गरजू, अनाथ, मतिमंद आणि उपेक्षित घटकांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असते.
संस्थेचे सर्व सदस्य PMPML चे कर्मचारी, माजी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. हे स्वयंसेवक पूर्णपणे निःस्वार्थ भावनेने काम करतात. कामाच्या तासांनंतरदेखील ते समाजसेवेसाठी वेळ देतात — हाच त्यांच्या सेवाभावाचा सर्वोच्च आदर्श आहे. श्रीमंत सेवा प्रतिष्ठान ही केवळ संस्था नाही, तर PMPML मधील कामगारांनी उभारलेली एक लोकचळवळ आहे, जी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्यासाठी झटत आहे.
श्री भरत गिरे : ९०९६९०५४४५
श्री नितिन दळवी : ९३२६३३०२०७
श्री सुभाष मोहिते : ९८६०९३९९४१
E Mail : shrimantseva@gmail.com